Video : जिवंत कुत्र्याला ब्रिजवरुन तलावात फेकले, व्हायरल व्हिडिओनंतर FIR दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तरुणाने एका जिवंत भटक्या कुत्र्याला ब्रिजवरुन तलावात फेकल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ही घटना घडली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तरुण एका ब्रिजवरुन कुत्र्याला खाली तलावात फेकतो. त्यानंतर कॅमेर्‍याकडे बघून हसताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकर्‍यांकडून प्रकारावर संताप व्यक्त केला होता. अखेर त्या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्त मजेसाठी आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी भटक्या कुत्र्यासोबत केलेल्या क्रूर कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर काही स्थानिक रहिवाशांनी भोपाळच्या श्यामला हिल्स पोलीस स्थानकात याबाबत तक्रार केली.

व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक तरुण ब्रिजवर भटक्या कुत्र्याच्या बाजूला उभा आहे. थोड्यावेळात तो कुत्र्याला अलगद उचलून काही क्षणांमध्येच तलावात फेकून देतो. ब्रिजवर असलेल्या इतर कोणाच्याही हा प्रकार लक्षात येत नाही. त्यानंतर हा तरुण मोठा पराक्रम केल्यासारखा व्हिडिओमध्ये निर्लज्जपणे हसताना दिसत आहे.