धायरीतील युवतीवर बलात्कार करुन खुन करणाऱ्याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – धायरीत राहत्या घरात शिरुन युवतीवर अत्याचार करुन तिचा खुन प्रकरणाचा छडा लावण्यात सिंहगड पोलिसांना यश आले आहे़  हे कृत्य तिच्या मावशीच्या पतीने म्हणजेच सख्या काकाने केल्याचे निष्पन्न झाले आहे.

नितीन दामोदर (रा. नऱ्हे) असे त्याचे नाव आहे.

आई वडिल कामावर गेल्यानंतर एकट्या असणाऱ्या या १७ वर्षाच्या युवतीवर अत्याचार करुन तिचा खुन करण्यात आला होता. शवविच्छेदनात तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले होते. मात्र, त्याबाबत कोणताही पुरावा अथवा या युवतीच्या मोबाईलमधून काहीही माहिती मिळाली नव्हती. सिंहगड पोलिसांना मध्यरात्री काही तांत्रिक माहिती तसेच परिसरात केलेल्या पाहणी व चौकशीतून नितीन दामोदर याच्या बाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. अतिशय गंभीर गुन्ह्याचा तपास १२ तासात लावण्यात सिंहगड पोलिसांना यश मिळाले आहे.

या युवतीचे कुटुंबिय सिंहगड भागातील धायरेश्वर वस्ती येथील  एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहते.  ही युवती परिसरातील एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिला एक १३ वर्षांचा भाऊ असून, तो आठवीत शिकतो. तिचे आई-वडिल मोल-मजूरीचे कामे करतात. ही युवती एकटीच घरी होती. तिचा भाऊ सायंकाळी  शाळेतून घरी आल्यानंतर त्याने बहिण बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेली पाहिली. अनेकदा आवाज देऊनही ती उठत नसल्याने त्याने आई-वडिलांना फोन करून याबाबत माहिती दिली.  मुलाचा फोन आल्यामुळे आई-वडिलांनी तत्काळ घरी धाव घेतली. यानंतर त्यांनी त्वरीत तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत्यु झाल्याचे सांगितले. दरम्यान, तिचा हात, पाय आणि गळ्यावर जखमा झाल्या आहेत. शवविच्छेदन करण्यात आले असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदनात बलात्कार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. याची माहिती मिळताच परिसरात एकच संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे सिंहगड रोड पोलिसांसह शहर गुन्हे शाखेनेही तपास सुरु केला होता.