मांडुळ तस्करांना अटक, ३० लाखांचे मांडुळ जप्त

कराड : पोलीसनामा ऑनलाइन – मांडूळ तस्करीसाठी आलेल्या दोघांना तालुका पोलिसांनी रविवारी (दि.१२) सायंकाळी पाचच्या सुमारास मालखेड (ता. कराड) येथील सम्राट लॉजसमोर सापळा ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३० लाख रूपये किमतीचे एक रेड सॅण्डबो जातीचे मांडूळ व एक दुचाकी, असा सुमारे ३० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पांडुरंग भगवान शिंदे (वय ३४), जयवंत शंकर ताटे (वय ३३, दोघेही रा. कासेगाव ता. वाळवा, जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड तालुक्यातील मालखेड गावच्या हद्दीतील सम्राट लॉज परिसरात दोघेजण मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक भापकर व पोलीस हवालदार म्हेत्रे यांनी मालखेड येथील सम्राट लॉज परिसरात सापळा रचला. सायंकाळी पाचच्या सुमारास पांडुरंग व जयवंत हे डिस्कव्हर गाडीवरून आले. त्यांच्या गाडीला एक पिशवी अडकवलेली होती.

पोलिसांना त्यांचा संशय आल्याने पोलिसांनी संशयीतांकडील पिशवी उघडून पाहिले असता पिशवीत असलेल्या डब्यात एक काळपट रंगाचे सुमारे ३० लाख रूपये किंमतीचे ६४ से. मी. लांबीचे आणि ८ सेमी जाडीचे मांडूळ आढळून आले. मांडूळाची विक्री करण्यासाठी आणले असल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, पोलीस हवालदार म्हेत्रे यांनी ही कारवाई केली. नांदगावचे वनरक्षक योगेश पाटील यांनी मांडूळाची ओळख पटविण्यास मदत केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे करत आहेत.