शिवसेना आमदारांच्या बैठकीत मराठा आरक्षण चर्चेला

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यातील विविध विभागांतील विकासकामे, प्रशासकीय बाबी मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांशी चर्चा काल केली आहे. मतदारसंघातील कामांबरोबरच कोल्हापुरातील आमदार प्रकाश आबिटकर यांनी मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने अस्वस्थता असल्याचे सांगत स्थगिती उठेपर्यंत पोलीस भरती करू नये, अशी लोकभावना असल्याकडे मुख्यमंत्री ठाकरे यांचे लक्ष वेधले.

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदारांशी विभागनिहाय चर्चा सुरू केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या आमदारांशी त्यांनी चर्चा केली. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, अनिल बाबर, शहाजी बापू पाटील, प्रकाश आबिटकर आदी आमदार या वेळी उपस्थित होते. मतदारसंघातील कामांच्या पाठपुराव्यासाठी कामाला लागा. त्यासाठी आवश्यक ती मदत मंत्रालयातील अधिकार्‍यांकडून मिळेल, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिला आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे समाजात अस्वस्थता असल्याचा विषय उपस्थित केला. स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न होणे आणि स्थगिती उठेपर्यंत पोलीस भरतीसह भरती प्रक्रिया थांबवण्याची मागणी मराठा समाजातून होत आहे. त्यामुळे त्याबाबत विचार करावा, अशी मागणी केली. त्यावर मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून भरती प्रक्रियेबाबत शक्य ते सर्व केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्याचे आबिटकर यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात मराठा समाजातील तरुणांसाठी सरकारने विविध योजना लागू केल्याचे सांगत त्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. त्याचा लाभ मराठा समाजातील तरुणांना मिळेल याकडे आमदारांनी लक्ष ठेवावे. तसेच कोरोनाच्या साथीला नियंत्रित करण्यासाठी आमदारांनी प्रशासनाला मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या.