काही मुलं ‘गतिमंद’ असतात, शरद पोंक्षेंची राहुल गांधीवर ‘टीका’

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी वादग्रस्त विधान केले होते. मी राहुल सावरकर नाही तर मी राहुल गांधी आहे, मी माफी मागणार नाही असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या या विधानाचा अभिनेते शरद पोंक्षे यांनी समाचार घेतला आहे. काही मुलं गतिमंद असतात अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजीत ‘आम्ही सर्व सावरकर’ या कार्यक्रमात ते ‘सावरकर विचार दर्शन’ या विषयावर बोलत होते.
शरद पोंक्षे यांनी यावेळी राहुल गांधी यांचा दिल्लीतील शेंबडा मुलगा असा उल्लेख केला. मला तर त्याचे आभार मानायचे आहेत. मी त्याचावर चिडत नाही. काही मुलं गतिमंद असतात. उलट मी त्यांचे आभार मानतो असा उपहासात्मक टोला पोंक्षे यांनी लगावला आहे. मी त्याला विनंती करतो की, सतत दीड दोन महिन्यांनी त्याने असंच विधान करत रहावं. त्याच्यामुळे काय होतं, हिदू धर्मियांना एक रोग आहे लगेच थंड होण्याचा. आपण पेटतही लवकर नाही आणि पेटलो तर लवकर शांत होतो. आपल्यातला शिवाजी, सावरकर लवकर जागा होत नाही, त्यासाठी अशा माणसांची गरज पडते.
पोंक्षे पुढे म्हणाले, तो तिकडं वेड्यासारखा बोलला की सगळ्यांच्या मनातील सावरकर, टिळक, शिवाजी, जागे होतात. मग आपण धडाधड त्यांच्याबद्दल शोधाशोध करण्यास सुरुवात करतो. काही मिळतय का असे म्हणत व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड होण्यास सुरुवात होते. त्यात माझीही अनेक भाषणं अनेक ठिकाणी फिरतात. त्यानंतर माझ्यातही सावरकरांबद्दल जागृती होते, ही चांगली गोष्ट आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/