वेस्ट इंडिजला 2 वर्ल्डकप जिंकून देणारा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून झाला निवृत्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज मार्लोन सॅम्युअल्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ३९ वर्षीय सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजला २०१२ आणि २०१६ चा वर्ल्डकप जिकून दिला होता त्यामध्ये त्याने सर्वाधिक धाव केल्या होत्या.

सॅम्युअल्सने निवृत्तबाबत वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला कळवलं होतं. सॅम्युअल्सने आपल्या क्रिकेट करिअरमधील अंतिम सामना २०१८ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. सॅम्युअल्स आपल्या तुफानी बॅटिंगसाठी प्रसिद्ध होता. भल्याभल्या बॉलरला आपल्या बॅटींगच्या तालावर नाचावण्यात तो माहिर होता.

सॅम्युअल्सने २०१२ साली झालेल्या टी – ट्वेन्टी अंतिम सामन्यात झंझावती खेळी उभारत क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. श्रीलंकेविरुद्ध ५६ बॉलमध्ये ७८ धावांची धमाकेदार खेळी केली तसेच गोलंदाजी मध्येही ४ ओव्हरमध्ये १५ धावा देऊन एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवत संघाच्या विजयात त्याने मोलाचा वाटा उचलला होता.

२०१६ साली झालेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळताना ६६ बॉलमध्ये नाबाद ८५ धावा त्याने केल्या होत्या. त्याच्या याच खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लंडला पाणी पाजून दुसऱ्यांदा टी-ट्वेन्टी वर्ल्डकप विजेते होण्याचा मान मिळवला होता. याच मॅचमध्ये त्याला ‘मैन ऑफ द मॅच’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.

सॅम्युअल्सने वेस्ट इंडिजकडून ७१ कसोटी, २०७ एकदिवसीय आणि ६७ टी – ट्वेन्टी सामने खेळले. तिन्ही फॉर्मटमध्ये सॅम्सुअल्सच्या नावावर १७ शतकांच्या साहाय्याने ११ हजार ३३४ धावा आहेत. तसंच बॉलिंगमध्ये आपला करिश्मा दाखवताना १५२ बळी त्याच्या नावावर आहेत.