बारणे – जगताप म्हणजे लोकनाट्य तमाशा : मारुती भापकर

पिंपरी : पोलिसनामा ऑनलइन – खासदार श्रीरंग आप्पा बारणे व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यातील ते सर्व आरोप – प्रत्यारोप लोकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा होता काय ?” असा सवाल सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी उपस्थित केला आहे.

मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी शहर भाजपवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेत. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी मनोमिलन केले आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यात त्यांनी हे वरील वक्तव्य केले आहे.

पुढे या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, ”सन २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेशी युती तोडून स्वतंत्र निवडणुक लढवली. त्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, यांची अफजलखान, औरंगजेबाशी तुलना करुन दिल्लीश्वरांचे ‍आक्रमण म्हणून बेचारा बनून मते मागितली. त्यावेळी उध्दव ठाकरे एकटे पडतात, अशी सहानुभूती तयार होऊन सेनेचे स्वबळावर ६३ आमदार निवडुण आले. त्यानंतर मागील चार वर्षात स्वबळाचा नारा देत, युतीत २५ वर्षे सडलोय, आता मुका घेतला तरी युती नाही. हर हिंदू की यही पुकार पहीले मंदिर फिर सरकार ही घोषणा अयोध्येत जाऊन उध्दव ठाकरेंनी दिली. तर पंढरपुरात चौकीदार चोर आहे, अशी घोषणा केली. तर भाजपाने शिवसेनेची औकात काढत पटक देंगे, म्हणत मातोश्रीच्या माफीयागीरीचा उल्लेख करीत मातोश्रीच्या भ्रष्टाचाराचा कोठाळा काढण्याची भाषा केली.

या सगळ्या भूमिका व वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस नागपुरकर सह उध्दव ठाकरे मुंबईकर बहूरंगी बहुढंगी लोकनाट्य तमाशाने महाराष्ट्राच्या जनतेचे खुप मनोरंजन झाले. चौकीदार “चोर” म्हणनारे, चौकीदार “थोर” म्हणत मोदी मोदी मोदी असा आक्रोश करीत आहेत. मात्र राजकारणात असे घडू शकते हे मान्य…

सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे व आमदार लक्ष्मण जगताप यांचे एकमेकांना शह-काटशह देत कुरघोडीचे राजकारण करीत आले. त्यामध्ये खासदार बारणे यांनी पंतप्रधान आवास योजना ही घरे देण्यासाठी की घरे भरण्यासाठी? र. रु. ४२५ कोटीच्या रस्ते विकासाच्या कामात भाजपाचा ९० कोटीचा घोटाळा, लक्ष्मण जगताप यांना सत्तेची धुंदी, टी.डी.आर माफियांचा, नदीपात्र चोर म्हणून जगताप यांच्यावर जाहीर आरोप केले. तर आमदार लक्ष्मण जगताप यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचा श्रीरंग हा नटरंग आहे, माती चोर आहे, बारणेनी प्राधीकरणांचे भुखंड ढापले, फोटोवाला खासदार, मावळचा मावळता खासदार, लोकसभा निवडणुकीत बारणेना जनताच घरी बसवेल. अशी शेलकी विश्लेषणे वापरुन जगताप यांनी जहरी टिका केली. या आरोप प्रत्याआरोपाची जुगलबंदी शहराने अनुभवली. या कलगीतू-यांना सर्व माध्यमांतून खूप प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तमाशा कलावंत स्व. काळू-बाळूं लोकनाट्य तमाशाला मागे टाकेल, असा भाऊ सांगवीकर सह आप्पा थेरगावकर यांच्या बहूरंगी, बहूढंगी लोकनाट्य तमाशाने जनतेची करमणुक केली आणि या तमाशाचे वगनाट्य “अशी ही बनवाबनवी” हे ही खूप गाजले. मात्र राजकरणात असे घडू शकते. हे मान्य…

मात्र २०१७ महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता परीवर्तन झाले. भय भ्रष्टाचार महापालिका ही घोषणा देऊन भाजपाने मते घेऊन सत्ता संपादन केले. सत्ताधारी भाजपाने कारभाराची सुरुवात करनांच ३१ मार्च नंतरची ठेकेदारांची बिले अडवून, त्यातून टक्केवारीच्या गैरव्यवहाराचा श्री गणेशा केला, भक्ती शक्ती उड्डाणपूल ग्रेडसेप्रेटरचे १०० कोटीच्या कामातील गैरव्यवहार, पालखी सोहळ्यात ताडपत्री खरेदी गैरव्यवहार, शहरातील कचरा उचलण्याची व वाहतूकीची सुमारे ४०० कोटीच्या निविदेतील गैरव्यवहार, पंतप्रधान आवास योजनेच्या र. रु. ४१० कोटी रकमेच्या निविदेतील गैरव्यवहार, रस्ते विकासाच्या र. रु. ४२५ कोटीच्या निविदेतील ९० कोटीचा गैरव्यवहार, मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प गैरव्यवहार, चिखली टाळगाव येथील संत पीठातील कामाच्या निविदेतील गैरव्यवहार, सुरक्षा व आरोग्य कर्मचा-यांच्या ठेक्यातील गैरव्यवहार, मागील २ वर्षात सुमारे ५३०० कोटीच्या रकमेचा टी. डी. आर वाटप, यातील अनेक विषयाबाबत आम्ही पंतप्रधान मुख्यमंत्र्याला तक्रारी दिल्या. त्याला माध्यमातून प्रसिध्दी मिळाली. त्यातूनच खासदार, आमदार व शिवसेनेच्या पदाधिका-यांनी ही तक्रारी केल्या. मागील २ वर्षात सत्ताधारी भाजपवाले करदात्या नागरिकांच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडे टाकत होते. ते रोखण्यासाठी लोकप्रतीनिधी म्हणून खासदार, आमदार व शिवसेनेच्या पदाधिका-यांनी ही तक्रारी केल्या. त्याचे आम्ही स्वागत केले.

मात्र, लोकसभेच्या निवडणूकीच्या तोंडावर खासदार श्रीरंग बारणे व आमदार लक्ष्मण जगताप यांचे मनोमिलन होत असताना. आपली खुर्ची वाचविण्यासाठी या सगळ्या तक्रारी बिनाशर्त मागे घेऊन खासदार बारणे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पायी अक्षरशः लोटांगण घातले. तर तिकडे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार महेश लांडगे यांच्या पायी अक्षरशः लोटांगण घातले. याचा सरळा अर्थ आहे की, भ्रष्टाचाराच्या विरोधातील खासदारांचा लढा सस्पसेल बोगस होता. मागील २ वर्षातील शहरातील भ्रष्टाचारांच्या आरोपांचे मनोमिनल झाले आहे. आता त्यातील हिस्सेदारीच्या टक्केवारीचे प्रमाण व लेखाजोखा खासदार व आमदार यांनी जाहीर करावा. व्यक्तीगत आरोप-प्रत्यारोप करणे, मागे घेणे, याच्याशी आमचा काही मतलब नाही. मात्र, वरील जनतेच्या संबंधीत विषयावर अशा प्रकारे स्वत:च्या स्वार्थासाठी माघार घेऊन त्यातून अर्थ लाभ करुन घेणे. हा सरळ सरळ जनतेशी द्रोह आहे. ही जनतेच्या डोळ्यात नुसती धुळफेक नसून मातीफेक आहे. खासदार व आमदार यांची ही बोगस भुमीका सुजान, विवेकी व सजग नागरिकांना कधीच आवडणार नाही. त्यामुळे या भुमिकेबाबत खासदार, आमदारांना जनताच माफ करणार नाही, हे मात्र नक्की”, असे भापकर यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Loading...
You might also like