मार्वल बिल्डरवर कोंढवा पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फसवणूक केल्याप्रकरणी विश्वजीत झंवर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. मात्र आता विमानतळ व कोंढवा पोलिस ठाण्यांतही त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल कऱण्यात आले आहे.

याप्रकरणी राजेश महादेव पाटणे (५०, शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्वजित सुभाष झंवर, सुभाष सिताराम गोयल, राजेंद्र सिताराम गोयल, उमेश सिताराम गोयल, रतनलाल गुलाबचंद गुंडेचा, मुळचंद कस्तुरचंद ओसवाल, बबलीबाई मुळचंद ओसवाल यांच्यावर फसवणूक व महाराष्ट्र मालकी हक्काच्या फ्लॅटबाबत अधिनियम १९६३ च्या  कलमांनुसार गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

फिर्यादी राजेश पाटणे यांचा पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय आहे. त्यांनी २०१२ मध्ये मार्वल गंगा सांगरिया या प्रकल्पामध्ये फ्लॅट विक्रीसंदर्भातील जाहिरात पाहिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना प्रकल्पातील ३८०० स्क्वेअर फुटचा पेन्ट हाऊस फ्लॅट आवडला. त्यानंतर त्यांना फ्लॅटचे कोटेशन दिले. त्यात फ्लॅटची किंमत २ कोटी २६ लाख ७४ हजार रुपये देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी फ्लॅट बुक केला. त्यासाठी मार्वल लॅन्डमार्क प्रा. लि. सोबत दुय्यम निबंधक हवेली ८ यांच्या  कार्यालयात या फ्लॅटबाबत करारनामा करून देण्यात आला. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी एकूण १ कोटी ६६ लाख ३७ हजार ९५१ रुपये दिले. फ्लॅटचा ताबा देण्याबाबत विचारणा केल्यावर झंवर यांनी त्यांना र२०१३ मध्ये ताबा देणार असल्याचे सांगितले.आपल्या अग्रीमेंटवर पझेशनची तारीख चूकून पडली असल्याचे सांगितले. त्यानंतर विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच ताबा न देता बांधकाम अपुर्ण ठेवत विचारणा केल्यावर शिवीगाळही केली. त्यानंतर पाटणे यांनी फसवणूक केल्याप्रकऱणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा  दाखल केला आहे.