Coronavirus : पर्वतावर 1000 मीटरचा ‘तिरंगा’ बनवून स्विर्त्झलॅन्डनं दाखवली ‘एकजूटता’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विरोधात लढत असून या महामारीला थांबविण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना व्हायरसचा भारतावर देखील परिणाम होत आहे. मात्र असे असले तरी संपूर्ण देश कोरोना विरोधात असणाऱ्या युद्धात एक झाला आहे. सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा गंभीर परिस्थितीत एकतेचा संदेश देण्यासाठी तसेच या लढ्यात भारताचे कौतुक करण्यासाठी स्वित्झर्लंड येथील मॅटरहॉर्न पर्वतावर नुकतीच भारताच्या तिरंग्याची रोषणाई करण्यात आली.


कोरोना विषाणूच्या संसर्गाचे निर्मूलन करण्यासाठी संपूर्ण जग झगडत आहे. अनेक देश एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. कोरोनाच्या उपचारांसाठी भारताने अनेक देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध पाठवले आहे. त्याचबरोबर इतर देशांनीही भारताला कोरोना टेस्ट किट दिली आहेत.


स्वित्झर्लंडने आल्पस पर्वतरांगेतील मॅटरहॉर्न पर्वतावर भारताचा तिरंगा झळकावून कोरोना व्हायरसविरोधातील भारताच्या लढ्यातील एकतेचे कौतुक केले आहे. भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी गुर्लीन कौर यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर करत यासंदर्भातील माहिती देखील दिली आहे. शुक्रवारी रात्री सुमारे 14690 फूट उंच पर्वतावर प्रसिद्ध लाईट आर्टिस्ट असणाऱ्या गेरी हॉफस्टेटर यांच्या संकल्पेनेतून ही रोषणाई करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय दूतावासाचे हे ट्विट पुन्हा रि-ट्विट केले आणि लिहले की, कोरोनाबरोबर जग एकत्र लढत आहे. मानवता नक्कीच या साथीच्या रोगावर मात करेल, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.