मोदींची काश्मीरनीती अपयशी ; म्हणूनच विधानसभा निवडणुका नाही

लखनऊ : वृत्तसंस्था – देशभरात १७ व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत सात टप्प्यामध्ये मतदान होईल. लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणचाल प्रदेश आणि सिक्किम या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका ही घेण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केला. मात्र, दहशतवादामुळे नाजूक स्थिती असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणूक न घेण्याचे आयोगाने ठरविले. या गोष्टीला उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरले आहे.

सुरक्षेची कारणं बालिश
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या विधानसभा निवडणूक होणार नाही यावर मायावती म्हणाल्या की, ‘जम्मू-काश्मीरमधील विधानसभा लोकसभेबरोबर न घेण्याचा निर्णय हा मोदींची काश्मीरनीती अपयशी झाल्याचे संकेत देत आहे. ‘राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित पार पाडण्यासाठी भारताचे सुरक्षा दल सक्षम आहे. यामुळे लोकांचाच त्रास कमी होणार आहे. केंद्र सरकारनं यासाठी दिलेली सुरक्षेची कारणं बालिश आहेत.’

जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूक न घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. पहिला टप्पा ११ एप्रिल रोजी होणार असून दुसरा टप्पा १८  एप्रिल, तिसरा टप्पा २३  एप्रिल, चौथा टप्पा २९  एप्रिल, पाचवा टप्पा ६ मे, सहावा टप्पा १२ मे तर शेवटचा टप्प्यात १९ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे.२३ मे २०१९  रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालांची घोषणा केली जाईल.