सांगलीतील जावेद गवंडी टोळीला ‘मोक्‍का’ !

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली जिल्ह्यात दहशत निर्माण करुन गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या जुना बुधगाव रस्ता परिसरातील जावेद गवंडी टोळीच्या 3 सदस्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्का लावण्यात आलेल्यामध्ये जावेदसह नितीन आनेराव, आकाश चव्हाण यांचा समावेश आहे.

जावेदच्या टोळीतील सदस्य हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरी, शिवीगाळ करुन हाणामारी करणे, खून, घातक शस्त्रे बाळगणे, लूटमार आदी गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी मिरजेतील एका लाकूड व्यापाऱ्याला खरेदी च्या बहाण्याने कर्नाळ येथे बोलावून त्याला चाकूचा धाक दाखवून जावेदसह साथीदारांनी लुटले होते. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या टोळीच्या गुन्हेगारी कारवाया सुरू होत्या.

त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडे पाठवला होता. शर्मा यांनी तो प्रस्ताव मंजुरीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे पाठवला होता. वारके यांनी आज या प्रस्तावाला मंजुरी दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, ग्रामीणचे निरीक्षक चंद्रकांत बेदरे, संतोष माने, विशाल भिसे यांनी यासाठी प्रयत्न केले.

आरोग्यविषयक वृत्त –