कोरोनाचा हाहाकार ! राज्यात एकाच महिन्यात तब्बल 810 कोटींचे ‘मेडिक्लेम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या १४ लाख १६ हजार ५१३ झाली आहे. तर ३७ हजार ४८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवरती उपचार खर्चापोटी विमा कंपन्यांकडे दाखल होत असलेल्या क्लेमच्या संख्येत सुद्धा वाढ नोंदवली आहे. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान राज्यातील सुमारे ७० हजार रुग्णांनी ९०० कोटी रुपयांचे क्लेम दाखल केले आहेत. पण सप्टेंबर च्या एका महिन्यात तब्बल ६५ हजार रुग्णांनी ८१० कोटींच्या उपचार खर्चाचा परतावा मागितला आहे.

देशभरातील २६ लाख ६१ हजार रुग्ण सप्टेंबर महिन्यात आढळून आले असून, ३३ हजार ३९० रुग्णांचा मृत्यू झाला. जनरल इन्शुरन्स कौन्सिलकडील आकडेवारीनुसार, ३० सप्टेंबरपर्यंत देशभरातून तीन लाख १८ हजार रुग्णांनी आरोग्य विम्यासाठी ४,८८० कोटींचे क्लेम विमा कंपन्यांकडे सादर केले. त्यातील एक लाख ९७ हजार रुग्णांचे दावे मंजूर करण्यात आले असून ती रक्कम १,९६४ कोटी रुपये आहे. त्यात ऑगस्टअखेरीस दावे करणाऱ्या रुग्णांची संख्या एक लाख ७९ हजार होती. त्यांचे दावे दोन हजार ७०० कोटी रुपयांचे होते. सप्टेंबरमध्ये दोन लाख १९ हजार रुग्णांचे क्लेम दाखल झाले असून ती रक्कम २,१८० कोटी आहे. एप्रिल ते ऑगस्ट पेक्षा सप्टेंबर मध्ये दावे करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

महाराष्ट्रातील क्लेम ४२ टक्के
देशात कोरोनाचा प्रसार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे आरोग्य विम्यासाठी दाखल होणारे सर्वाधिक क्लेमही महाराष्ट्रातील आहेत. देशातील तीन लाख १८ हजारांपैकी एक लाख ३५ हजार म्हणजेच ४२ टक्के क्लेम महाराष्ट्रातून दाखल झाले. त्यानंतर तामिळनाडू (३२,८३०), गुजरात (२७,९१३) या राज्यांचा क्रमांक आहे.