लॉकडाऊनचे उल्लंघन करून घाटकोपरच्या सोसायटीमध्ये ‘समोसा’ पार्टी, आयोजकांवर FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन दिवस रात्र प्रयत्न करत असून लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. असे असताना घाटकोपरमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून समोसा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रकरणी आयोजकांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

घाटकोपर येथील पंत नगर भागातील एका गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांवर समोसा पार्टी आयोजित करून लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आणि पक्षाचे संयोजक यांना याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांना जामिनावर सोडण्यात आले. पुढील चौकशी सुरु आहे अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 37 हजारावर गेली आहे. तर कोरोनामुळे एक हजाराच्या वर मृत्यू झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि पुणे या ठिकाणी आढळून आले असून येणाऱ्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.