IPL : सलग ९ वर्ष चेन्नईला त्यांच्याच घरात रोहित शर्माकडून ‘धोबीपछाड’

चेन्नई : वृत्तसंस्था – आयपीएल २०१९ मध्ये काल झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा सहा विकेट्सने पराभव करत फायनल मध्ये प्रवेश केला. यापूर्वी मुंबईने २०१०, २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये फायनलमध्ये धडक दिली होती. त्यापैकी २०१० वगळता तीनही वेळा मुंबईने विजेतेपद मिळवले होते. मुंबईने फायनलमध्ये धडक मारली असून, त्यांचा सामना क्वालिफायर २ च्या विजेत्याशी होईल. त्याआधी चेन्नईला १० मे रोजी एलिमनेटर विजेत्यांशी सामना करावा लागेल. आज एलिमनेटरमध्ये दिल्ली कॅपिटल विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे.

दरम्यान, कालच्या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, मुंबईच्या माऱ्यासमोर त्यांना २० षटकांत केवळ ४ बाद १३१ धावाच करता आल्या. चेन्नईने दिलेले हे आव्हान मुंबईने केवळ १८. ३ षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक नाबाद ७१ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ५४ चेंडूत १० चौकार ठोकले. त्याने तिसऱ्या विकेटसाठी ईशान किशनसोबत ८० धावांची भागीदारी केली. यामुळे मुंबईला विजय मिळवणे सोपे गेले.

चेन्नईचा होमग्राऊंडवर मुंबईकडून सहावा पराभव

दरम्यान, होमग्राऊंडवर मुंबईकडून पराभव होण्याची ही चेन्नईची सहावी वेळ आहे. सलग सहा वेळा मुंबईने चेन्नईचा त्यांच्याच मैदानात पराभव केला. २०१० नंतर चेन्नईला घरच्या मैदानात मुंबईविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही.