बैलासोबत स्वतःला घेतलं ‘जुंपून’, महामार्गावर गाडी ओढताना दिसला ‘बिचारा’, खुपच वेदनादायक चित्र

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान एक हृदय विदारक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अडचणीत सापडलेल्या एका कुटुंबातील एक माणूस बैलासोबत जुंपलेला असून राष्ट्रीय महामार्गावर गाडी खेचताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या दाव्यानुसार हा व्हिडिओ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- 3 (आग्रा-मुंबई महामार्ग) चा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये महामार्गावरील बैलगाडी हळू हळू चालताना दिसत आहे, ज्यात एक बैल आणि त्या बैलासोबत एका माणसाला जुंपलेले आहे.

घरातील काही वस्तूंनी भरलेल्या बैलगाडीवर एक महिला आणि एक तरुण बसलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस आपली गाडी बैलासोबत खेचत असून त्याने आपले नाव राहुल असे सांगितले आहे आणि त्याचे वय सुमारे 40 वर्षे असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये बैलासोबत जुंपलेल्या व्यक्तीने व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की, ‘मी पत्थरमुंडला गावचा (इंदूर शहराजवळील) रहिवासी आहे आणि महू वरून निघालो आहे. बैलगाडीत भावाची बायको आणि लहान भाऊ बसलेला आहे. आम्ही गावाकडे जात आहोत.’

बैलासमवेत बैलगाडीला जुंपलेला व्यक्ती असहाय्य स्वरात म्हणाला, ‘लॉकडाऊनमुळे बसेसही चालत नाहीत. बसेस चालल्या असत्या तर आम्ही बसने प्रवास केला असता. माझे वडील, भाऊ आणि बहीण पुढे पायी चालत गेले आहेत.’ राहुलने सांगितले की, त्याचे कुटुंब गावोगावी फिरून बैलांच्या खरेदीचे काम करते. तसेच तो पुढे म्हणाला की, ‘आम्ही काय करावे? माझ्याकडे दोन बैल होते. परंतु माझ्या घरात पीठ आणि स्वयंपाकाच्या इतर वस्तू संपल्या होत्या. म्हणून मी 15,000 रुपयांचा बैल केवळ 5000 रुपयांत 15 दिवसांआधी विकला, जेणेकरून मला माझे घर चालवता येईल.’

दरम्यान या व्हायरल झालेल्या व्हिडिओची प्रशासनाने दखल घेतली आहे. उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) प्रतुल सिन्हा यांनी बुधवारी ‘पीटीआय-भाषा’ ला सांगितले की, ‘मी महूच्या जनपद पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना या प्रकरणाचे संपूर्ण सत्य शोधण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत.’ व्हिडिओत बैलगाडीला जुंपलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असून संबंधित सरकारी योजनेंतर्गत त्याच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे सिन्हा म्हणाले.