दुधाच्या दरात प्रति लिटर 4 ते 5 रूपयांची होणार ‘वाढ’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच बहुतांश दूध विक्रेत्यांनी दुध दरात वाढ केली होती. आता पुन्हा वाढ झाल्यास सर्वसामान्यांना मोठा फटका बसू शकतो. दुधाच्या दरात प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची, तर दुग्धजन्य पदार्थ्यांच्या दरात 8 ते 10 रुपयांची वाढ अपेक्षित असल्याचे अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

सोढी म्हणाले, अर्थसंकल्पात दूध उद्योगासाठी चांगल्या तरतुदी केल्या आहेत. दुधासह इतरही उत्पादनांची ने-आण करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक विशेष प्रकल्पांची घोषणा केली आहे. रेल्वे आणि नागरी उड्डाण मंत्रालय अनुक्रमे कृषी उड्डाण आणि किसान रेल्वे या प्रकल्पांवर काम करणार आहेत. यामुळे दूध आणि शेती उद्योगाला चालना मिळेल. सध्या देशात 53.5 मेट्रिक टन दुधावर प्रक्रिया होते. 2025 पर्यंत हाच आकडा 108 मिलियन मेट्रिक टनवर नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी 40 ते 50 हजार कोटींची गुंतवणूक आवश्यक आहे.

सोढी यांनी सांगितले की, दूध पुरवठा करण्याची क्षमता जास्त असलेल्या कंपन्यांना यंदा मोठा फायदा होईल. दूध उत्पादक कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये दोनदा दुधाच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांचे उत्पन्न 2018 च्या तुलनेत 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहे.