शिवसेनेचा बार फुसका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- प्रत्येक गोष्टीसाठी लढा उभारतो म्हणायचे आणि लढाईला गेल्यावर रणांगणातून पळ काढायचा. माघार घेणे हे मराठी बाण्याला न परवडणारे आहे. जो अंगार वाटला होता तो अंगार नव्हता तो फुसका बार निघाल्याचे चित्र काल पाहायला मिळाले आहे अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते आमदार हेमंत टकले यांनी शिवसेनेवर केली आहे. अशी प्रतिक्रिया मीडियाशी बोलताना दिली आहे.

पुढे हेमंत टकले म्हणाले बर्‍याच प्रतीक्षेनंतर जे होणार होते ते अखेर काल घडले आहे. लुटुपुटुच्या लढाया केल्यानंतर मतदारांची किती फसवणूक करतोय हे थोडे जरी स्वतःच्या आत शिवसेनेने डोकावून पाहिले तरी तुम्ही कशाची लढाई करत होतात हे लक्षात येईल. तसेच विरोधी पक्षाची जागा व्यापून तुम्ही एकप्रकारे भाजपलाच मदत करत होतात. तुमचा हा कुटील डाव म्हणजे बाहेरुन आम्ही भांडण करतोय असे दाखवायचे आणि मतलबासाठी व स्वार्थासाठी त्यांच्यासोबत रहायचे हे आता उघड झाले आहे. केंद्रात व राज्यात त्यांचेच सरकार येणार आहे, हे ते गृहीत धरून चालले आहेत. हे कशाच्या जोरावर सुरु आहे. सगळे जनमत त्यांच्याविरोधात जात असताना अशा वल्गना करणे आणि त्यामुळे शिवसेनेने त्यांच्या आजपर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत कधी नव्हे इतकी जबरदस्त फसवणूक महाराष्ट्रातील मराठी माणसाची, जनतेची केली आहे असा आरोपही आमदार हेमंत टकले यांनी केला आहे.

कित्येक पिढयांमधील शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द मनापासून झेलला आणि प्राण तळहातावर घेवून लढाई करावी तसे ते शिवसेनेसाठी लढले. एक एवढा शब्द त्यांना पुरेसा होता . परंतु आज बोलघेवड्यांच्या नादामध्ये अमित शहा काय बोलतात, देवेंद्र फडणवीस काय बोलतात आणि नको नको म्हणताना नाणारची जागा हलवू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करु मान्य आहे, अहो चार वर्षे आम्ही तेच ओरडत होतो, तुम्ही त्याच्यात साथ देत होतात. सभागृहात चार वर्षाच्या कालावधीत दिसले की, सभागृहात सरकारविरोधात मोठमोठ्याने ओरडायचे, राजीनामे घेवून फिरतोय म्हणायचे आणि ऐनवेळेस माघार घ्यायची ही पद्धत शिवसेनेने अवलंबलेली पहाण्यास मिळाली असेही हेमंत टकले यांनी म्हटले आहेत.

मुळात यांच्या खिशात राजीनामे नव्हतेच यांना सत्तेची चटक इतकी लागलेली आहे की, त्यामुळे त्यातून मिळणारे जे काही फायदे आहेत ते स्वतः पुरते घ्यायचे आहेत ते मराठी माणसासाठी नाहीत. शिवसैनिकांसाठी तर अजिबातच नाही या सगळ्यावर पांघरूण घालण्यासाठी एक चादर घ्यावी लागते. त्या चादरीमध्ये गेल्यावर कुणाचे चेहरे दिसणार नाहीत ते लपवले जातील ती चादर आहे हिंदुत्वाची. आज बेरोजगार पिढीपुढे… गावातील सामान्य नागरीकांपुढे जे जगण्याचे प्रश्न आहेत त्यांना ही चादर उघडून प्रश्न सुटणार नाहीत हे वाटत आहे. त्यामुळे हा बुरखा टराटरा फाटल्याशिवाय राहणार नाही. केवळ सत्तेसाठी लाचार होवून एकत्र येऊन केलेला हा खेळ आहे. हे लोकांना कळायला वेळ लागणार नाही असेही आमदार हेमंत टकले म्हणाले.