50 लाखाचा गुटखा असलेला ट्रकचा आमदारांनी केला पाठलाग, पण….

चाळीसगाव : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात चाळीसगाव येथून गांजा, गुटखा पुरविला जातो. त्यामुळे चाळीसगावला गुटख्याचे हब असेही म्हणतात. याच चाळीसगाव परिसरातून एका आमदाराने पन्नास लाखाचा गुटखा असलेल्या ट्रकचा पाठलाग केला, अन् तो ट्रक पकडला. पण आमदारांची तक्रार घ्यायला पोलिस तयार नाहीत. या घटनेची चर्चा काल दिवसभर होती. लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे वागणूक देणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात मी दाद मागणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) हद्दीत गुटखा असलेला ट्रक चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पकडला. मंगेश चव्हाण म्हणाले की मेहुणबारे येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुमारे पन्नास लाखाचा गुटखा घेऊन जाणारा ट्रक (एमएच १८-एम ०५५३) पकडला. वरिष्टांच्या आदेशानुसार हा ट्रक जळगाव येथे आणत मी त्याचा पाठलाग करून हा ट्रक शिरसोली येथील जैन व्हॅली येथे पहाटे चार वाजता पकडला. या ट्रक वरील संपूर्ण अवैध गुटख्याची तपासणी करावी, संबंधित गुटखा मालक व्यक्तींवर चौकशी करून कारवाई करावी. या प्रकरणी मी पोलिसांकडे तक्रार केली. पण माझी तक्रार पोलिसांनी घेतली नाही. याबाबत उच्च न्यायालयात मी दाद मागणार आहे.

पत्रकारांशी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले की हा ट्रक मेहुणबारे पोलिसांनी का सोडला त्या पोलीस ठाण्यात गुन्हा का दाखल केला नाही ? यावरून गुन्हे शाखेच्या पोलीस, जिल्हा पेठ पोलिस निरीक्षक पटेल यांना विचारला असता. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तीन तास वाद चालला झाला. यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुढे यांच्या सुचनेनुसार अखेर ट्रक जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या आवारामध्ये आणण्यात आला. पोलिसांचे चाळीसगाव मधील अवैध धंदे वाल्यांना अभय आहे. युवा पिढी गुटखा, गांजाच्या विळख्यात अडकत आहे. मी त्यांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, पोलिस अवैध धंदे वाल्यांना पाठीशी घालत आहे. मी दिलेली फिर्यादही घेतली नाही. लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे वागणूक देणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात मी दाद मागणार आहे.