आमदार पी.एन. पाटील यांना मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांचा ‘उद्रेक’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सलग चाळीस वर्षे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून देखील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले नसल्याने आमदार पी.एन. पाटील सडोलीकर यांच्या कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा उद्रेक झाला आहे. नाराज कार्यकर्त्यांनी पुढील दिशा ठरवण्यासाठी बुधवारी (दि.1 जानेवारी) सकाळी अकरा वाजता फुलेवाडी येथे अमृत मल्टीपर्पज कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे.

पाटील यांनी पक्षाच्या अडचणीच्या काळात जिल्हाध्यक्षपदाची धुरा तब्बल वीस वर्षे सांभाळून पक्षाचे आस्तित्व जिल्ह्यात टिकवून ठेवले. जिल्ह्यातील सहा पैकी चार विधानसभा निवडणुकांत पक्षातील काही नेत्यांनीच फितुरी करून पाटील यांचा निसटता पराभव केला. तरी देखील पाटील यांनी संयम पाळून पक्षाचे काम केले. 2004 मध्ये विलासराव देशमुख यांचे सरकार असताना देखील त्यांच्या मंत्रिमंडळात पाटील यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे देशातील पहिले स्मारक कोल्हापूरात उभारण्याबरोबर त्यांच्या नावाने सुतगिरणी उभारली. इतर पक्षांनी दिलेले आमंत्रणे नाकारून त्यांनी गांधी-नेहरु कुटुंब आणि काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिले. यंदाच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, यंदाही त्यांना डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा असंतोषाचा उद्रेक झाला आहे. कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत टीका करण्यास सुरुवात केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/