बहुमत चाचणीवेळी पवारांचे ‘राजकारण’ समजेल, पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याची वेगळीच शंका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पवारांच्या कुटुंबात नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेस यांना एकत्र आणून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकासआघडीचे सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु केली असतानाच अजित पवारांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, अजित पवारांची ही कृती बंडखोरी आहे की शरद पवारांची खेळी, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबद्दल जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी शंका बोलून दाखवली आहे.

विनय कोरे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी घेतलेल्या भुमिकेवर शंका व्यक्त करताना कोरे म्हणतात, राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे. मात्र यातला कोणता गट मोठा आहे हे बहुमत चाचणीवेळीच कळेल. अजित पवारांच्या मागे जास्त आमदार आहेत की शरद पवारांच्या पाठीमागे जास्त आमदार आहेत किंवा हे दोघे एकत्रितपणे या सगळ्या गोष्टी घडवत आहेत, हे विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आल्यावरच समजेल असे म्हणत कोरे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली.

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार माध्यमांपासून लांब राहिले. मात्र, राष्ट्रवादीकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न करण्यात येत आहे. आज अजित पवार यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अध्यक्ष अमित शहांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानले. तर आपण राष्ट्रवादीतच असू, कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचे नेते असल्याचे ट्विट अजित पवार यांनी केले आहे.

Visit : Policenama.com