आमदारांची फोडाफोडी करणार नाही : शिवराजसिंग चौहान

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – मध्यप्रदेश निवडणुकीत थोड्याफार फरकाने पराभव झाला असला, तरी भाजपची मते विरोधाकांना गेलेली नाहीत. झालेला पराभव हा जनतेचा दिलेला कौल असल्याचे मान्य करीत आता आमचा पक्ष विरोधकामध्येच बसेल. आमदारांची फोडाफोडी न करता ५ वर्षे विरोधातच राहू, असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज (मंगळवार) सायंकाळी शनिशिंगणापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना केले.

माजी मुख्यमंत्री चौहान हे सायंकाळी शनिशिंगणापूर येथे सपत्नीक व कुटुंबातील सदस्यांसह येऊन शनिदेवाला तेलांचा अभिषेक करून चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले. त्यांच्या समवेत पत्नी, सासू, मुलगा होते. ते म्हणाले, मी दरवर्षी नव्या वर्षाचे स्वागत शिर्डी व शनिशिंगणापूर या तीर्थक्षेत्राला येऊन करतो. मी महाराष्ट्रात,मध्यप्रदेश व सर्व राज्यातील आम जनतेला सुख शांती लाभो, अशी एकमेव पार्थना करतो. विरोधी पक्षात राहून शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठविल.

यावेळी आ. बाळासाहेब मुरकुटे, ज्ञानेश्वर पेचे, बाळासाहेब बोरुडे, मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे, सायराम बानकर, विश्वस्त वैभव शेटे, सरपंच बाळासाहेब बानकर, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर  तहसीलदार सुधीर पाटील  आदी उपस्थित होते  शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्यावतीने  माजी मुख्यमंत्री चौहान  व त्यांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.

पत्नी व सासू चौथऱ्यावर नाही

चौहान यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी व सासू शनी दर्शनासाठी आल्या होत्या. महिलांना चौथऱ्यावरून दर्शनाची मुभा देण्यात आलेली आहे. तरीही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या पत्नी व सासूने चौथऱ्यावर न जाताच खालून दर्शन घेतले.