वाढीव वीज बिलाबाबत ‘मनसे’ आक्रमक ! सोमवारपर्यंतची दिली डेडलाईन, अन्यथा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   वाढीव वीज बिलांच्या प्रश्नावरून (electricity-bill) मनसेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाढीव वीज बिलांबद्दल सोमवारपर्यंत निर्णय घ्या. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढू आणि त्यानंतर अतिशय उग्र आंदोलन करू. मनसे स्टाईल आंदोलन काय असतात, याची कल्पना राज्यातील आहे, अशा शब्दांत मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी ठाकरे सरकारला थेट इशारा दिला आहे.

नांदगावकर गुरुवारी (दि. 19) पत्रकार परिषदेत बोलत होते. वीज बिलप्रश्नी दिलासा देण्याचे आश्वासन ठाकरे सरकारने दिले होते. मात्र उर्जामंत्र्यांनी शब्द फिरवला. हा राज्यातल्या साडे अकरा कोटी जनतेचा विश्वासघात आहे. राज्य सरकारमध्ये मतभेद असतील. त्यांच्यात पक्षीय राजकारण असेल. मात्र त्याचा फटका जनतेने का सहन करायचा, असा सवाल नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. राज्यातल्या जनतेने वीज बील भरू नयेत. आम्ही त्यांच्या पाठिशी असल्याचे नांदगावकर म्हणाले. वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्यास येऊ नये. कर्मचारी वीज कापण्यास आल्यास मनसैनिक त्यांना सामोरे जातील. त्यानंतर काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी सरकारची असेल, असा स्पष्ट इशारा नांदगावकर यांनी दिला.

महाविकास आघाडी सरकारमध्ये शरद पवार यांच्या शब्दाला किंमत नाही का?
आम्ही वीज बिल प्रश्नावर सुरुवातीला कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. अदानी, रिलायन्सचे अधिकारी येऊन मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटून गेले. मात्र तरीही प्रश्न न सुटल्याने राज ठाकरे शेवटचा पर्याय म्हणून राज्यपालांच्या भेटीला गेले. राज्यपालांनी त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्यास सांगितले. त्याप्रमाणे राज ठाकरेंनी हा प्रश्न शरद पवारांच्या कानावर घातला. त्यांनी निवेदन देण्यास सांगितले. आता निवेदन देऊन अनेक दिवस उलटले तरीही प्रश्न सुटलेला नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आता शरद पवारांच्याही शब्दाला किंमत नाही का, असा प्रश्न नांदगावकर यांनी उपस्थित केला.