मनसेच्या नेत्यानं ट्विट केलं PM मोदींचे ‘ते’ भाषण

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन  –  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका केली होती. तसेच राज ठाकरेंनी निवडणूक न लढवता राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतली होती. तसंच काही व्हिडिओ दाखवत नरेंद्र मोदी यांच्या योजनांची पोलखोल करत टीका केलेली. आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एका सभेतील व्हिडीओ संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरती शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये मोदी यांनी म्हटलं आहे की, अलिकडे पॅकेजची घोषणा करण्याची एक फॅशन झाली आहे. आतापर्यंत इतके आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. पण तुम्हाला आतापर्यंत काही मिळालं आहे का? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी सभेत उपस्थित असणाऱ्या लोकांना केला आहे. पॅकेज फक्त घोषित करण्यात येतात, मात्र ते लोकांपर्यंत पोहचत नाही, असं देखील मोदी यांनी व्हिडीओ मध्ये बोलताना म्हणाले आहेत. संदीप देशपांडे यांनी हाच मुद्दा घेत “कधी खरं बोलतात, कधी खोटं बोलतात समजतच नाही”, असं म्हणत व्हिडीओ ट्विट केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी देशाला २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत असं नाव देऊन आतापर्यंतच सर्वात मोठं आर्थिक पॅकेज त्यांनी जाहीर केलं आहे. तसंच त्यांनी देशाला संबोधित करताना स्वदेशीचा नारा दिला. आम्ही आत्मनिर्भर भारत बनवू शकतो. निश्चय केला तर कोणतेही लक्ष साध्य करता येते. निश्चयाने भारत आत्मनिर्भर होऊ शकतो, असं मोदींनी सांगितलं आहे.