मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. पण लोकहिताच्या प्रश्नांसाठी राज ठाकरे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे समजते. दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार जो संघर्ष उभा राहिला होता. त्या अनुषंगाने या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

लॉकडाऊन आणि अनलॉकच्या वेळी समाजातील विविध घटकांनी आपले प्रश्न घेऊन कृष्णकुंज गाठले होते. त्यामध्ये मुंबईचे डबेवाले, त्रंबकेश्वरचे पुजारी, जेष्ठ नागरिक, कोळी महिला, डॉक्टरांचे शिष्टमंडळ, महिला बचत गट अशा अन्य घटकांनी राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या होत्या. यातील काही प्रश्न राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार करुन मार्गी लावले होते.

त्याचप्रमाणे ग्रंथालय सुरु करण्यासाठी राज ठाकरे यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांसोबत चर्चा करुन प्रश्न सोडवून घेतला होता. तसेच जीम चालकांनी सुद्धा राज ठाकरे यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्यावर राज ठाकरे यांनी जीम सुरु करा, बाकी मी बघतो असे विधान केले होते. त्यानंतर राज्यातील जीम हळू हळू उघडण्यात आल्या. मंदिरे सुरु करण्याचीही मागणी राज ठाकरे यांनी केली होती. दरम्यान, राज ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.