मनसेचं फेरीवाल्यांविरोधात पुन्हा आंदोलन

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – कालच अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. अशातच मनसेनं मुंबई महापालिकेच्या महापौरांच्या वॉर्डमध्येच फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं असल्याचं समजत आहे. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेचं फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन पुन्हा सुरु झाल्याचं समजत आहे.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रभागातील फेरीवाल्यांना मनसैनिकांनी पिटाळून लावल्याचं दिसून आलं आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सांताक्रूज पूर्वेकडील रेल्वे स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं. इतकेच नाही तर या दरम्यानच मनसे उपविभागाध्यक्ष अखिल चित्रे आणि शाखाध्यक्ष संदेश गायकवाड यांची स्थानिक वाकोला पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसोबत वादावादीही झाल्याचेही समोर आले आहे.

‘हे’ पक्ष करत आहेत हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून दिशाभूल : शरद पवार

अनधिकृत फेरीवाल्यांना प्रशासकीय अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता. याबाबत कालच राज ठाकरेंनी  महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये फेरीवाले यांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली होती. याचवेळी फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा आंदोलन करू असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.

नेमकं काय म्हणाले होते राज ठाकरे ?

रेल्वे स्टेशनच्या दीडशे मीटर जागेत फेरीवाले बसणार नाही, हे स्पष्ट असतानाही अधिकारी फेरीवाल्यांकडून पैसे घेऊन त्यांना बसवतात, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. अशा अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांना केलं होतं. तसेच कारवाई न केल्यास मनसे स्टाईल कारवाई होईल, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला होता.