‘मनसे’आता दुर्मिळ प्रजातीचा पक्ष : सुधीर मुनगंटीवार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांच्या ‘मनसे’ पक्षाचा प्रत्यक्षात सहभाग नव्हता. मात्र त्यांनी राष्ट्रवादीला साथ दिली आणि त्यांचा प्रचार केला. ‘लाव रे तो व्हिडीओ’ वरून राज ठाकरे सोशलवर चांगलेच गाजले. त्यांच्या या प्रचारामुळे भाजप आणि मनसेमध्ये चांगलाच सामना रंगला होता. मात्र आता मनसे हा दुर्मिळ प्रजातीचा पक्ष ! अशी टीका राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

राज ठाकरे यांच्या मनसे विषयी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, निवडणूक लढवायची नाही, राजकारणात प्रत्यक्ष भाग घ्यायचा नाही. फक्त टीका करत राहायचे हीच मनसेची ओळख बनली आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. वैयक्तिक जहरी टीका करण्यापेक्षा देशाच्या विकासासाठी बोललात तर बरं राहील, असा सल्लाही त्यांनी राज ठाकरेंना दिला आहे.

आदेश आला तर प्रदेशाध्यक्ष
यावेळी पुढे बोलताना त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी भाष्य केले. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्री होण्याआधीच भाजपमध्ये प्रवेश होईल, असं त्यांनी जाहीर केलं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाआधी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं ते म्हणाले. रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष कोण अशी चर्चा आहे. त्यावर, भाजपमध्ये आदेश येईल तशी नेमणूक होते, असं त्यांनी सांगितलं. मला आदेश आला तर मीही प्रदेशाध्यक्ष होऊ शकतो, असं ते म्हणाले.