मनसेचे बाबाराजे यांच्या हाती कमळ ?

पुणे : महेंद्र बडदे – मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराजे जाधवराव आता रेल्वे इंजिनला बाय- बाय करीत हातात कमळ घेणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. जाधवराव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पुरंदर तालुक्यातील राजकीय चित्र भविष्यात बदलु शकते. जाधवराव यांचे वडील दादा जाधवराव यांनी पंचवीस वर्षाहुन अधिक काळ तालुक्यात सत्ता आणि वर्चस्व ठेवले होते. त्यांचे वारस असलेले बाबाराजे हे सध्या मनसेच्या शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात होते. भाजप चे नेते ही त्यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्नात होते. मागील लोकसभा विधानसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघात भाजपने त्यांच्या मित्रपक्ष चे नेते महादेव जानकर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना जानकर यांनी कडवी लढत दिली होती. जानकर यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली असती तर या मतदारसंघातील चित्र वेगळे दिसले असते असे विश्लेषण मागील लोकसभा निवडणुकीनंतर केले गेले होते. या पार्श्वभूमीवर यंदा भाजपचा उमेदवार कोण असेल ? खासदार सुप्रिया सुळे यांना कोण आव्हान देणार ? याविषयी उत्सुकता लागलेली आहे.

बाबाराजे यांना भाजपमध्ये प्रवेश घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न भाजपचे काही नेते करीत आहेत. काल बाबाराजे आणि त्यांचे समर्थक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती कळते. बारामती लोकसभा मतदारसंघातून बाबाराजे हे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे देखील बाबाराजे यांना पक्षात घेणे विषयी सकारात्मक आहेत. बाबा राजे यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर पुरंदरचे राजकारण बदलण्यास मदत होऊ शकते. बाबाराजे मुळचे पुरंदर तालुक्यातील असल्याने या भागात भाजप वाढविण्यासही त्यांचा उपयोग होऊ शकतो. शिवसेनेचे विद्यमान आमदार आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना सातत्याने विरोध उभा करणारे बाबाराजे यांचा भाजप प्रवेश कधी होणार हे एक-दोन दिवसातच ठरणार आहे.

ह्याही बातम्या वाचा –

काँग्रेसच्या ‘या’ बालेकिल्ल्यातच राहुल गांधींविरोधात ‘पोस्टरबाजी’