PM मोदी तुम्हाला ‘गुरु’ मानतात… राउतांच्या ‘गुगली’वर शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

पोलिसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तुम्ही गुरु आहात, यावर शरद पवारांनी अगदी खुलून उत्तर दिले आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली.

मोदी तुम्हाला गुरु मानतात, त्यांना तुम्ही अर्थव्यवस्था सावरण्यासंदर्भात काही सल्ला द्याल ? असा प्रश्न विचारताच शरद पवार खळाळून हसले आणि म्हणाले, मोदी तुम्हाला गुरु मानतात असे म्हणून तुम्ही मलाही अडचणीत आणू नका आणि मोदींनाही अडचणीत आणू नका. राजकारणात कुणीही कुणाचा गुरु नसतो. सोयीची भूमिका आम्ही लोक एकमेकांच्या संदर्भात मांडत असतो. अलिकडे त्यांची माझी काही भेट झालेली नाही. कोरोनाचे संकट आल्यानंतर त्यांनी सर्वपक्षीय बैठका घेतल्या. त्यामध्ये त्यांच्याशी जो संवाद झाला त्यापलिकडे त्यांचा माझा संवाद नाही.

अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी मोदींनी काही जाणकारांची मदत घेण्याची आवश्यकता होती. आरबीआयचे एक गव्हर्नर होते जे सोडून गेले, काय झाले ते ठाऊक नाही. अशी माणसे किंवा डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखी यांच्याशी मोदींनी चर्चा करायला हवी. मात्र तसे करताना ते दिसत नाहीत. देशात अनेक जाणकार आहेत जे चांगला सल्ला देऊ शकतात. असे स्पष्ट मत पवार यांनी मांडले. देशाला एका मनमोहन सिंग यांची गरज आहे का? यावर शरद पवार म्हणाले, होय 100 टक्के गरज आहे. मनमोहन सिंग ज्यावेळी आपल्या देशाचे अर्थमंत्री होते तेव्हा मी त्या मंत्रिमंडळात होतो. तेव्हाही देशापुढे आर्थिक अडचणी आल्या होत्या. अर्थव्यवस्था ढासळली होती. मात्र मनमोहन सिंग यांनी त्या संकटातून मार्ग काढला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like