छोट्या व्यापार्‍यांसाठी खुशखबर ! सरकारच्या ‘या’ निर्णयामुळं पैसे वाचणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्यासाठी सरकारने मंगळवारी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटीबाबत छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. जीएसटी रिटर्न फाइलला उशीर झाल्याबद्दल सरकारने छोट्या व्यापाऱ्यांकडून उशीरा शुल्क न घेण्याची घोषणा केली आहे. याशिवाय वस्तू व सेवा कर (GST) दाखल करण्यासाठी सरकारने अंतिम तारीख वाढविण्याची देखील घोषणा केली आहे. जीएसटी रिटर्न भरण्याची तारीख सरकारने ३० जून २०२० पर्यंत वाढविली असून व्यापारी आता मार्च, एप्रिल आणि मे चा जीएसटी रिटर्न ३० जूनपर्यंत फाईल करू शकतात.

उशीरा शुल्क आकारले जाणार नाही
अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ५ कोटी रुपयांपर्यंत टर्नओव्हर असणाऱ्या व्यावसायिकाकडून उशिरा शुल्क आकारले जाणार नाही. तथापि ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त टर्नओव्हरसाठी ९ टक्के व्याज दराने शुल्क आकारले जाईल. या व्यतिरिक्त सरकारने कंपोजिशन रिटर्न भरण्याची मुदत वाढवून ३० एप्रिल २०२० करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी लवकरच आर्थिक पॅकेज
अर्थमंत्री म्हणाल्या की कोरोना विषाणू संदर्भात लॉकडाऊन पाहता सरकार लवकरच विविध क्षेत्रांना मदत करण्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करेल. त्या म्हणाल्या की, उशीर होणार नाही, लवकरच पॅकेज जाहीर केले जाईल.

करदात्यांनाही मिळाला मोठा दिलासा
करदात्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ मार्च ते ३० जून २०२० पर्यंत वाढविली आहे. यासह, उशीरा कर भरणावरील व्याज दर देखील १२ टक्क्यांवरून वार्षिक ९ टक्के करण्यात आला आहे.