प्रजासत्ताक दिनी नृत्य करणाऱ्या लहान मुलींवर पोलिसाकडून पैशांची उधळण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – खरेतर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असते. पोलिसांना सामाजिक जबाबदारीचे  भान असायला हवे मात्र प्रजासत्ताक दिनी एका पोलिसाकडून सामाजिक भान विसरल्याचे पाहायला मिळाले. पोलीस प्रशासनाची मान शरमेने खाली जाईल अशी घटना नागपूर जिल्ह्यातील नांद गावामध्ये घडली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एका पोलिसाने नृत्य सादर करणाऱ्या शालेय विद्यार्थिनींवर पैसे उधळल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसाच्या या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातील नांद गावात  प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात  शालेय विद्यार्थीनी देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य सादर करत होत्या. यावेळी समोर उपस्थित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्टेजवर येऊन चक्क विद्यार्थिनींवर पैसे उधळले.
दरम्यान,  कार्यक्रमात या पोलिसाने मोठा गोंधळ घातल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व प्रकारामुळे नांद गावामधील लोकांनी सदर पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.