…म्हणून तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढतेय

पोलीसनामा ऑनलाइन – देशात तोंडाच्या कॅन्सरच्या रूग्णांचे प्रमाण अधिक आहे. तोंडाचा कॅन्सर हा देशभरातील दुसरा प्रामुख्याने दिसून येणारा कॅन्सर आहे. ५० टक्के पुरुषांमध्ये दिसून येणारा तोंडाचा कॅन्सर हा तंबाखूमुळे होतो. तर महिलांमध्ये हे प्रमाण ३० टक्के आहे. राज्यातील ग्रामीण भागातही तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात तर तोंडाच्या कर्करोगाची ५५० प्रकरणे तपासणीत आढळली आहेत. सर्च फाऊंडेशन, गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरने तपासणी करून या कॅन्सरग्रस्त रूग्णांची नोंद केली आहे.

तंबाखूच्या सेवनाने लोकांच्या आरोग्यावर परिणाम असून यातून तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे राज्य सरकार आणि टाटा ट्रस्टच्या मदतीने गडचिरोलीत तंबाखूचं सेवन आणि मद्यपानाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी मुक्तीपथ कार्यक्रम राबवण्यात येत आहे. गरचिरोलीसारख्या भागात तोंडाच्या कॅन्सरचे वाढते रूग्ण ही धोक्याची घंटा आहे. याशिवाय याठिकाणी आरोग्यसेवेची कमतरता असल्याने कॅन्सर पुढील टप्प्यात जातो. कॅन्सरचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्यावर उपचार होण्यासाठी कॅन्सर रूग्णांची नोंद होणे गरजेचे आहे. गडचिरोलीसारख्या भागात हे काम सार्वजनिक आरोग्य विभागासोबत करणे आवश्यक आहे.