काय सांगता ! होय, खासदार नवनीत राणा यांनी धावत्या एसटी बसच्या दारात उभं राहून दिली प्रतिक्रिया

मेळघाट : पोलीसनामा ऑनलाइन – मेळघाटामधील आदिवासी नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडू, असे सांगत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी धावत्या एसटीमधून वार्ताहरांशी संवाद साधला. पण तेव्हा त्यांनी तोंडाला मास्क लावला नव्हता. तद्वतच धावत्या बसच्या दारात उभे राहत वार्ताहरांना अशी प्रतिक्रिया देणे कितपत योग्य आहे ?, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मागील पाच दिवसांपासून अचलपूर-मेळघाट विधानसभा संपर्क दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी मुंबईत अत्याधुनिक बसेस धावतात आणि मेळघाटात जुन्या भंगार बसेस चालवल्या जातात. हा आदिवासींच्या जीवाशी चालणारा खेळ तात्काळ थांबवून सुखरूप प्रवास करतात येईल, अशी व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी केली.

तथापि, नवनीत राणा व त्यांच्या कुटूंबातील १२ सदस्यांना कोरोनाची बाधा झाली होती. नवनीत राणा यांच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरु होते. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आले होते. मुंबईत उपचार झाल्यावर त्यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली होती. पण कोरोना झाल्यानंतर कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याची जाणीव असून देखील नवनीत राणा यांनी विना मास्क धावत्या एसटीच्या दारात उभे राहून प्रवास केला. त्यांचा हा प्रवास वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

दरम्यान, अचलपूर-परतवाडा परिसरातील कामगारांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली फिनले मिल कोरोना टाळेबंदीमुळे बंद पडली आहे. त्यामुळे तेथील कामगार उपोषणास बसले असून नवनीत राणा व रवी राणा यांनी उपोषणास भेट दिली. कामगारांना भेटून त्यांची आस्थेने विचारपूस केली व तेथूनच तातडीने केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याशी संपर्क साधून कामगारांना न्याय देण्याचे सुचवले. त्यावरती स्मृती इराणी यांनी लवकरच यावर तोडगा काढू, असे वचन नवनीत राणा यांना दिले.