मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी छत्रपती संभाजीराजेंना सांगितला नवा फॉर्म्युला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर अनेक मराठा बांधव नाराज झाले आहेत आणि पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी जवळपास 5 ते 6 फॉर्म्युले सुचवल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली. इतकंच नाही तर शरद पवारांनी मराठा आरक्षणात मध्यस्थी करावी असा आग्रह देखील संभाजीराजे यांनी केला आहे.

सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. यानंतर विरोधी पक्ष भाजपनं सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. या स्थगितीसाठी राज्य सरकारलाही जबाबदार ठरवलं जात आहे. अशात मराठा संघटनाही आक्रमक झाल्या असून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांनी मराठा आरक्षणात मध्यस्थी करावी असा आग्रह त्यांनी पवारांना केला आहे असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

तमिळनाडूला वेगळा आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का ?
खासदार संभाजीराजेंनी राज्यसभेत तमिळनाडूला वेगळा आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का ? असा सवाल उपस्थित केला आहे. संभाजीराजेंनी मराठा आरक्षणविषयीची मागणी केली. महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी आपापल्या परीनं सभागृहात आवाज उठवला पाहिजे. यासाठी आपण सर्वांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाचा विषय निर्णायक वळणावर येऊन थांबला आहे. आता सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याची वेळ आली आहे असंही संभाजीराजेंनी सांगितलं.