‘देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी माझी’ !

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत असताना त्यांनी जात पाहिली नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा रेटून नेला. मग तुम्हाला का जमत नाही?, असा सवाल भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे फडणवीस यांच्याकडे पुन्हा सत्ता द्या, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतो, ती जबाबदार माझी राहील’ असे खासदार उदयनराजे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून आहे. मंडल आयोगावेळी प्रत्येकाला आरक्षण मिळाले. पण, मराठा समाजाचा विसर पडला. त्यावेळच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता. आता आरक्षणाची बंदूक आमच्या खांद्यावर न ठेवता. स्वत:च्या हातात घ्या,’ असा सल्ला खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना नाव घेता दिला. दरम्यान, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रभर नेतृत्व करावे लागेल, असेही यावेळी उदयनराजे यांनी सुचित केले आहे.

सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे बोलत होते. संपूर्ण पत्रकार परिषदेत उदयनराजेंचा सर्व रोख हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरच होता. पण, पत्रकार परिषदेत एकदाही त्यांनी पवार यांचे स्पष्टपणे नाव घेतले नाही. खासदार उदयनराजे म्हणाले, मराठा समाजाचा प्रश्न राजकारणासाठीच प्रलंबित आहे. याच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. आपण किती दिवस या सामाजाचा अंत बघणार. तुम्हाला याची सखोल माहिती आहे. तुम्ही करु नका. पण, याचं उत्तर द्यायला हवे, आता सत्तेत असणाऱ्यांनी आरक्षण द्यावे. मंडल आयोगावेळी सर्व समाजाला आरक्षण मिळाले होते. मराठा समाजाचा विसर पडला. त्यावेळच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व मंत्रिमंडळाने यावर भाष्य करायला हवे, असेही उद्यनराजे यांनी म्हटले आहे.

… तर घराबाहेर पडू देणार नाही
संसद आणि राज्याच्या विधीमंडळातील सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींवर मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची नैतिक जबाबदारी आहे. इतर समाजाच्या लोकप्रतिनिधींनाही मराठा समाजाने मतदान केलेले आहे. लोकांनी विश्वास ठेवला. आता आरक्षण नसल्याने विश्वास उडाला आहे. सध्या कोरोना आहे. त्यामुळे माणसे शांत आहेत. त्यामुळे हेच लोक सत्तेतून खालीही खेचू शकतात व घरातून बाहेर पडूही देणार नाहीत, असा इशाराही उदयनराजेंनी यावेळी दिला आहे.

स्वतः करायचे नाही अन् दुसऱ्यावर खापर फोडायच
पत्रकार परिषदेपूर्वी बोलताना उदयनराजेंनी अनेक बाबींवर मत स्पष्ट केले. मराठा समाजाला डावलले जात आहे. स्वत: करायचे नाही मात्र, दुसऱ्यावर खापर फोडायंच काम सुरू आहे. कारण, त्यावेळी सर्व काही शक्य होते. त्यांनी का केले नाही, असा सवाल उद्यनराजे यांनी केला आहे. तसेच शासनाने परीक्षा घेताना मराठा समाजाच्या जागा बाजुला ठेवून घ्याव्यात, असेही स्पष्टपणे सांगितले.