मुनगंटीवारांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला तरी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून अडचण नसल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले होते. त्यावर आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

नांदेड दौऱ्यावर असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. तसेच शिवसेना हा पक्ष भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून अडचण नाही. सर्व काही विसरून जाऊ. सुबह का भुला श्याम को लोट आया असे समजून आम्ही त्याचा विचार करू असे वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले होते.

मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना अशोक चव्हाण यांनी म्हटले की, शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसंदर्भातील वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असेच म्हणावे लागेल. भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांमध्ये वितुष्ठ निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे माध्यमांना माझी विनंती आहे की त्यांनी भाजपचं जास्त ऐकू नये, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच आव्हाडांनी त्यांनी इंदिरा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिल्याने हा विषय संपला असल्याचेही त्यांनी सांगितले.