‘तिच्या’ अवयवदानामुळं गरजू रूग्णांचे वाचले प्राण

पोलीसनामा ऑनलाईन – अत्यावस्थ आवस्थेत नवी मुंबईतील वाशी येथील अपोलो रुग्णालयात एका ५९ वर्षांच्या महिलेला १८ मार्च, २०१९ रोजी दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत त्या महिलेला ब्रेन हॅमरेज झाल्याचं निदान झालं होतं. डॉक्टारांनी या महिलेला वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु, शेवटपर्यंत यश आले नाही. अखेर १९ मार्च २०१९ रोजी डॉक्टरांनी या महिलेस ब्रेनडेड घोषित केलं.

अपोलो रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे कुटुंबिय अवयवदानाबाबत जागरूक असल्याने त्यांनी तिच्या अवयवदानासाठी पुढाकार घेतला. कुटुंबाच्या परवानगीनुसार महिलेचे अवयव आणि टिश्यू दान करण्यात आले. महिलेचं यकृत, किडनी, तसंच डोळे आणि हाडं दान करण्यात आले. विभागीय प्रत्यारोपण समन्वयक समितीच्या नियमावलीनुसार गरजूंना अवयव देण्यात आले. या महिलेचे यकृत ग्लोबल रुग्णालयातील रूग्णासाठी पाठवण्यात आलं. एक किडनी अपोलो रुग्णालयातील तर दुसरी किडनी ज्युपिटर रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आली. डोळेलक्ष्मी आय बँकेत आणि हाड टाटा मेमोरिअल रुग्णालयात दान करण्यात आलं.