Coronavirus : मुंबईचा सगळ्यात धोकादायक ‘हॉटस्पॉट’ असलेल्या धारावीत ‘कोरोना’चा तिसरा बळी

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईत कोरोना फैलावासाठी सर्वाधिक धोकादयक परिसर असलेल्या धारावीत आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीत मृत्यू झालेल्यांची संख्या तीन झाली आहे. आज केईएम रुग्णालयात दाखल झालेल्या 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ती धारावीच्या कल्याणवाडी परिसरात रहात होती.

मुंबईत वरळी, प्रभादेवीनंतर आता धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट सर्वात धोकादायक ठरत आहे. अशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत दाटीवाटीच्या घरांमुळे या ठिकाणी कोरोना वेगाने पसरत आहे. मार्चच्या शेवटी धारावीत पहिला रुग्ण सापडला होता. आता धारावीत कोरोनाबाधितांची संख्या 14 झाली आहे. तर आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. धारावी रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला असून 10 भागांमध्ये भाजीविक्रीदेखील बंद करण्यात आली आहे. तसेच ये-जा करणारे रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून ठराविक भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. जास्त लोकसंख्या असलेल्या भागात कोरोनाचा फैलाव होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आत्तापर्यंत धारावीत सापडलेल्या 14 रुग्णांपैकी 4 जण डॉ. बलिगा नगर परिसरातील आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. सोशल नगर परिसरात राहणाऱ्या एका 70 वर्षीय व्यक्तीचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज कल्याणवाडीतील महिलेचा मृत्यू झाला.