आहो भाग्य ‘त्या’ लेकरांचं ! काळजाच्या तुकड्यासाठी आईचं ‘यकृत’दान, 2 मुलांना जीवनदान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या मुलांवर कोणतेही संकट आले तर धावून येणारी आई संकटाच्या काळात खंबीरपणे पाठिशी उभी राहते. प्रसंगी ते संकट आपल्यावर ओढावून घेत आपल्या काळजाच्या तुकड्याचे संरक्षण करते. असे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील दोन मातांनी आपले यकृतदान करून आपल्या काळजाच्या तुकड्याला जीवनदान दिलं आहे. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात या दोघांवरही यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली. जळगाव जिल्ह्यातील सहा वर्षाचा आराध्य सरोदे आणि हिंगोलीतील 9 वर्षाची मयुरी ढोंबरे या दोघांनाही यकृताचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. जन्मत: या दोघांनाही यकृताची समस्या होती. मात्र वेळेत निदान न झाल्याने त्यांचा आजार वाढला आणि यकृताचा कर्करोग झाला. वैद्यकीय भाषेत याला हेपाटोब्लास्टोमा (बालपणातील एक अत्यंत दुर्मिळ यकृत कर्करोग) असे म्हणतात. या गंभीर आजारामुळे दोन्ही मुलांचे यकृत निकामी झाले होते.
या दोन मुलांचे जीव वाचवण्यासाठी यकृत प्रत्यारोपणाशिवाय कोणताही पर्याय नव्हता. मात्र, या दोघांसाठी त्यांची आई पुढे आली. या दोन्ही मातांनी आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी आपले यकृत देण्याचा निर्णय घेत तशी इच्छा व्यक्त केली. मात्र देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने शस्त्रक्रिया देखील रखडल्या होत्या.

ग्लोबल रुग्णालयातील बालरोग हिपॅटालॉजिस्ट तज्ज्ञ डॉ. विभोर बोरकर यांनी सांगितले की, या रुग्णांना 10 वेळा केमोथेरपी देणे गरजेचे असतं. मात्र, बऱ्याचदा सातव्या किंवा आठव्या केमोथेरपीच्या सायकलनंतर रुग्णांची स्थिती पाहून यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणं आवश्यक असतं. या दोघांच्या बाबतीत लॉकडाऊन असल्याने मार्चमधील शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली होती. त्यामुळे केमोथेरपी सुरु ठेवण्यात आली होती. याच रुग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलैळीमकर यांनी सांगितले की, देशभरातील लॉकडाऊनमुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र रुग्णाची प्रकृती पाहून पहिल्यांदा जीव वाचवणे आवश्यक आहे. या अनुषंगाने डॉक्टरांनी या दोन मुलांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेमुळे दोन्ही मुलांना जीवनदान मिळाले आहे. परळ येथील ग्लोबल रुग्णालयातील यकृत प्रत्यारोपण सर्जन डॉ. रवी मोहंका आणि डॉ. अनुराग श्रीमल यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया झाली.

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी या दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच शस्त्रक्रिया करण्याचे ठरलं. दोन्ही मुलांच्या आईने यकृतदान करण्याची इच्छा व्यक्त केल्यानं शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, मयुरीची आई आशा ढोंबरे यांचा रक्तगट जुळत नसल्याने त्यांना एक विशिष्ट इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर 1 मे रोजी तिच्यावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. याशिवाय 20 मे रोजी आराध्याच्या आईने यकृताचा भाग दान केल्यावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती डॉ. रवी मोहंका यांनी दिली. लहान मुलांवर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीचे काम आहे. मात्र डॉक्टरांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलले आहे. शस्त्रक्रियेनंतर या दोन लहान मुलांना 24 तास डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले होते. आत या दोघांचीही प्रकृती उत्तम असून त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे.