राज्यात वर्षभरात 13070 नवजात बालकांचा मृत्यू, मुंबईत सर्वाधिक बालमृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दरवर्षी हजारो नवजात बालकांचा मृत्यू होत असतो. महाराष्ट्र राज्यात नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण हे नंदुरबार, मेळघाट, पालघर, जव्हार आणि मोखाडा या आदिवासी जिल्ह्यांत जास्त आहे, परंतु देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई शहरामध्ये २०१८-१९ दरम्यान १४०२ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याचा आरोग्य विभाग बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असताना देखील राज्यात तब्बल १३ हजार ७० नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.

नवजात बालकांचे वाढत जाणारे मृत्यूचे प्रमाण याबाबदल आमदार मंगेश कुडाळकर, आशिष शेलार यांच्यासह अनेक सदस्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. एच.एम.आय.एस.च्या अहवालानुसार राज्यात सन २०१८-१९ या काळात २ लाख ११ हजार ७७२ बालकांचे वजन जन्मतःच अडीच किलोपेक्षा कमी आढळून आले आहे. मुंबई शहर व उपनगरात सर्वाधिक कमी वजनाची २२ हजार १७९ बालके जन्माला आली आहेत. या कालावधीत १३ हजार ७० बालकांचा मृत्यू झाला असून, १४०२ बालकांच्या मृत्यूची नोंद ही एकट्या मुंबई शहरात झाली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

बालक आणि मातेचा मृत्यू

१ एप्रिल ते १ डिसेंबर २०१९ मध्ये १४ हजार १४७ अर्भकांचे मृत्यू , तसेच ११ हजार ६६ नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ एप्रिल २०१९ ते १५ जानेवारी २०२० या कालावधीत १ हजार ७० माता मृत्युमुखी पडलेल्या आहेत.

मातामृत्यूची कारणे –

१) प्रसूतिपूर्व उच्च रक्तदाब

२) प्रसूतिपूर्व व पश्चात अतिरक्तस्त्राव

३) प्रसूतिपश्चात किंवा गर्भपातपश्चात जंतूदोष व रक्तक्षय.

नवजात बालकांच्या मृत्यूची कारणे

1) अकाली जन्माला आलेले बाळ

2) जन्मतः कमी वजनाचे बालक

3) जंतुसंसर्ग

4) न्यूमोनिया

5) सेप्सीस, जन्मतः श्वासवरोध

6) आघात

7) रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम