मुंबईतील पावसाने मोडला 46 वर्षांचा ‘विक्रम’ !

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल 46 वर्षांचा विक्रम मोडला आहे. पावसामुळे सखल भाग, रस्ते, रेल्वेमार्ग जलमय झाले आणि वाहतुकीचे सर्वच मार्ग पाण्याने रोखले होते. तब्बल 141 ठिकाणी झाडे कोसळली. सोसाटयाच्या वार्‍यामुळे अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर पाणीगळती रोखण्यासाठी झोपडयांवर घातलेले प्लास्टिक उडून गेले होते.

मुसळधार पावसामुळे एनडीआरएफ आणि आरपीएफच्या जवानदेखील बचावकार्यात उतरले होते. दरम्यान, मुंबईतील कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यातील गेल्या 46 वर्षांचा पावसाचा विक्रम मोडला आहे. कोलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यात तब्बल 46 वर्षांनंतर 12 तासांमध्ये 294 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. कुलाबा परिसरात 1974 च्या ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक 262 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर बुधवारी या ठिकाणी 293.8 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला आणि परिस्थितीचा आढावा घेतला. दोन दिवसांपूर्वी मिरा-भाईंदर परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते कोविड सेंटरचे उद्धाटन केले होते. पावसामुळे या कोविड सेंटरमध्येही पाणी शिरले होते.