मंत्री यशोमती ठाकूर यांना मोठा दिलासा, शिक्षेला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती जिल्हा न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्याविरुद्ध ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर निर्णय घेत उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देत ठाकूर यांना दिलासा दिला आहे. तद्वतच, न्यायालयाने पोलिसांना नोटीस बजावली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये महिला-बालकल्याण मंत्री पदी असलेल्या यशोमती ठाकूर यांना १५ ऑक्टोबरला तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ठाकूर यांनी २४ मार्च २०१२ साली पोलिसांशी हुज्जत घातली होती. पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर ठाकूर यांनी आम्ही निर्दोष असून, न्याय मागणीसाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले होते.

काय आहे प्रकरण ?

२४ मार्च २०१२ रोजी दुपारी तत्कालीन आमदार यशोमती ठाकूर या आपल्या वाहनाने काही कार्यकर्त्यांसह चुनाभट्टी ते गांधी चौक या एकेरी मार्गाने जात होत्या. तेव्हा वाहतूक पोलीस उल्हास रौराळे यांनी त्यांचे वाहन अडवले. हा एकेरी मार्ग असल्याचे सांगत त्यांनी वाहनास मनाई केली. त्यानंतर यशोमती ठकार यांच्यासोबत चालक, सागर, कार्यकर्ते शरद व राजू यांनी वाहनखाली उतरून कर्मचाऱ्यासोबत वाद घातला आणि मारहाण केली, अशी तक्रार उल्हास रौराळे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर चौकशी नंतर न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले.

याप्रकरणी न्यायालयाने ५ साक्षीदारांची साक्ष घेतली. त्यामधील १ साक्षीदार फितूर निघाला. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने यशोमती ठाकूर, सागर खांडेकर, शरद जवंजाळ व राजू इंगळे यांना तीन महिन्यांची शिक्षा, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.