मैत्रिणीची छेड काढणाऱ्यांची दिली पोलिसांत तक्रार, सपासप वार करून केला खून

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  मैत्रिणीची छेड काढणाऱ्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करणं एका तरुणाच्या जिवावर बेतलं आहे. पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून पाच ते सात जणांच्या टोळक्याने या तरुणाला बेदम मारहाण करत त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना चेंबूरच्या वाशीनाका येथे घडली आहे. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरु केला आहे.
चार दिवसांपूर्वी आरोपी आशिष आणि त्याच्या एका मित्राने एका मुलीची छेड काढली होती. त्यामुळे मयत प्रशांत पनवलकरने आशिषला हटकले होते. त्यामुळे दोघांमध्ये वाद होऊन शिवीगाळही झाली होती. त्यानंतर मयत प्रशांत याने पोलीस ठाण्यात जाऊन आशिष विरोधात मुलीची छेड काढल्याची तक्रार दाखल केली. यामुळे आशिष संतापला होता.

मंगळवारी संध्याकाळी मयत प्रशांत पीठ आणण्यासाठी चालला होता त्यावेळी आशिष आणि त्याच्या सात मित्रांनी त्याला घेरले. प्रशांतला शिविगाळ करून बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच प्रशांतच्या भावाने घटनास्थळी येऊन प्रशांतला त्यांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सात जणांनी प्रशांतवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रशांतला हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी आरसीएप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सातही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याआधी कोरोनामुळे पोलिसांनी छेडछाडीच्या प्रकरणी कुणालाही अटक केली नव्हती. मात्र, खूनाच्या घटना घडल्याने पोलिसांनी या सात जणांना अटक करून पुढील तपास सुरु केला आहे.