सांगलीत किरकोळ वादातून युवकाचा खून, 6 जणांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – मैत्रिणीचा पाठलाग केल्याच्या कारणावरून एका युवकाचा 9 ते 10 जणांनी दांडके, सिमेंटच्या पाईपने मारहाण करून खून केला. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. आकाश अशोक श्रीरापगोल असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 6 जणांना अटक केली आहे. यातील आणखी 3 संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

धर्मेश कांबळे (वय 26, रा. गव्हर्नमेंट कॉलनी), संभाजी कांबळे (वय 35, रा. गव्हर्नमेंट कॉलनी), उमेश कांबळे (वय 26, रा. गजराज कॉलनी), मनोहर कांबळे (वय 55, रा. गव्हर्नमेंट कॉलनी), केशव सुरगोंडा (वय 24, रा. मिरा कॉलनी), महेश कांबळे (वय 25, रा. हसनी आश्रम जवळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विनायक कांबळे, आकाश गुरव, विशाल कांबळे या संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. मात्र ते पसार झाले आहेत.

यातील मृत आकाश श्रीरापगोल हा सर्व संशयितांचा मित्र होता. तो आणि त्याचे वडील हसनी आश्रम जवळील एका हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी संशयितांनी मृत आकाशच्या मैत्रिणीचा पाठलाग केला होता. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्यात त्या हॉटेल जवळ पुन्हा वाद झाला. त्यावेळी संशयितांनी आकाशला दांडके, सिमेंटच्या पाईपने बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना तातडीने तपास करून संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले. निरीक्षक पिंगळे यांनी तातडीने पथके रवाना केली. त्यानंतर निरीक्षक पिंगळे यांना आकाशचा खून करणारे संशयित विश्रामबाग येथील कुंभार मळ्यात लपल्याची माहिती मिळाली. नंतर पथकाने सापळा रचून 6 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी अन्य तीन संशयितांची नावे सांगितली. तसेच गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करण्यात आली.

अधीक्षक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पिंगळे, उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, अमित परीट, वैभव पाटील, मेघराज रूपनर, बिरोबा नरळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.