खून करून अपघाताचा बनाव करणारे चारजण जेरबंद

पुणे (वाकड) : पोलीसनामा ऑनलाईन – कामावरून घरी परतणाऱ्या युवकावर कोयत्याने, लाकडी दांडुक्याने हल्ला करून खून करणाऱ्या चौघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. युवकाचा खून केल्यानंतर आरोपींनी अपघाताचा बनाव रचला होता. हा प्रकार १५ जुलै रोजी थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराच्या पाठीमागे रात्री साडेबाराच्या सुमारास घडला होता.

बाबासाहेब उर्फ मयुर वडमारे (वय-३४) असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत रुपसिंग भाट, राहुल उर्फ सुधीर शहादेव झेंडे, मेहबुब दस्तगीर पटेल, युवराज शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मयुरची बहिण विशाखा वडमारे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली होती.

घटनेच्या दिवशी मयुर वडमारे हा त्याच्या मित्राच्या आईला घेऊन कामावरून घरी जात होता. त्यावेळी आरोपींनी मागील भांडणाचा वचपा काढण्यासाठी मयुरवर कोयता, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मयुरवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरोपींनी हल्ला करून अपघात झाल्याचा बनाव केला. दरम्यान मयुरच्या बहिणीने पोलिसाकडे चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वाकड पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान पोलिसांना सहा महिन्यापूर्वी आरोपींचे आणि मयुरचे हिंजवडी येथे भांडण झाल्याची माहिती मिळाली. आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील इतर दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अतिरीक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस उपनिरीक्षक हरिष माने, सिद्धनाथ बाबर, तपास पथकातील कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, बापु धुमाळ, नितीन ढोरजे, विक्रम जगदाळे, प्रमोद भांडवलकर, सुरेश भोसले, रमेश गायकवाड, जावेद पठाण, दिपक भोसले, भैरोबा यादव, प्रमोद कदम, नितीन गेंगजे, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, शाम बाबा, प्रशांत गिलबिले, तात्या शिंदे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त