बारामतीच्या मटका व्यावसायिकाचा खून करणारा आरोपी नगरमध्ये जेरबंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – बारामतीतील मटका व्यावसायिक कृष्णा जाधव यांच्या खूनाच्या घटनेतील फरार आरोपी लोकेश माने याला पोलिसांनी चौकात नाकाबंदी दरम्यान पकडले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अन्वयेही कारवाई करण्यात आलेली आहे.

याबाबत माहिती अशी की, दि.१५/०३/२०१९ रोजी रात्री ८ ते दि १६/०३/२०१९ रोजी सकाळी ८ वाजे पर्यंत शहरातील कायनेटीक चौकात पोलीस अधिक्षक यांच्या आदेशान्वये नाकाबंदी करण्यात आली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी व त्याचे सोबत पोलिस कर्मचारी गणेश धोत्रे, नितीन गाडगे, संदिप धामणे, मुकुंद दुधाळ, प्रमोद लहारे, काकडे, तागड, पवार, शेख हे नाकाबंदी करीत होते. नाकाबंदीदरम्यान स.पो.नि. राजेश गवळी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी समजली की, खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी लोकेश परशुराम माने (वय – २७ वर्ष रा. कैकाडी गल्ली, ता. बारामती, जि. पुणे) हा अहमदनगर शहरात येणार आहे.

कायनेटीक चौकातील नाकाबंदी दरम्यान एक इसम मोटारसायकलवरुन अंधाराचा फायदा घेवुन नाकाबंदी चुकवुन पळुन जावु लागला. म्हणुन सदर पथकाने त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. त्याला विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव लोकेश परशुराम माने असे सांगीतले. अधिक माहिती घेतली असता त्याचे विरुध्द बारामती शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रमीण पोलीस स्टेशन येथे वेगवेगळ्या प्रकारचे ११ गुन्हे दाखल असल्याचे समजले. तसेच त्याने मटका व्यावसायीक कृष्णा महादेव जाधव याचा खून केला असल्याचेही समजले. त्याच्या विरुध्द २०१८ मध्ये मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.