ऐक्याचं दर्शन ! मुस्लिम युवकांनी केले हिंदू व्यक्तीवर ‘अंत्यसंस्कार’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीत निजामुद्दीन परिसरात तबलिगी समाजाने घेतलेल्या कार्यक्रमामुळे मुस्लिम समाजावर टीकेची झोड उठली असतानाच सोलापुरात मात्र वेगळे चित्र पाहायला मिळलं आहे. सोलापुरात एका हिंदू व्यक्तीच्या निधनानंतर त्याचा अंत्ययात्रेला चक्क मुस्लिम युवकांनी पुढाकार घेतला. एवढेच नाही तर पुढे जाऊन हिंदू- परंपरेने अंत्यविधीही पार पडला.

उत्तरप्रदेशमधील भोलाशंकर नामक कामगाराचे गोदूताई विडी घरकुल परिसरात हृदयविकाराने निधन झाले. मूळ आग्रा येथील असलेले भोलाशंकर हे रोजीरोटीसाठी सोलापुरात आले होते. मात्र, लॉकडाऊन मुळे ते सोलापुरात अडकून पडले. भोलाशंकर यांचा बुधावरी अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सोलापुरात भोलाशंकर एकटेच राहायला असल्याने त्यांचे कोणीही नातेवाईक नव्हते. परिसरात राहणाऱ्या लोकांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क केला. मात्र, देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना सोलापुरात पोहचणे जवळपास अशक्य होते. त्यामुळे अखेरीस परिसरातील मुस्लिम तरुणांनी पुढाकार घेऊन भोलाशंकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

तौफिक तांबोळी, महिबूब मनियार, वसीम तांबोळी, अफजल पठाण, वसीम देशमुख, मल्लिनाथ पाटील या तरुणांनी या कामात पुढाकार घेतला. याच तरुणांनी त्यांच्यासाठी तिरडी बांधण्यास सुरुवात केली. कुंभारी येथील एका पुरोहिताला बोलवून हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण केली. तसेच याच लोकांनी भोलाशंकर यांना खांदा देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून सामाजिक व धार्मिक ऐक्याचे दर्शन घडवले.