मुळा धरणात बुडून मायलेकाचा मृत्यू, पिता बचावले !

शहरातील सातपुते कुटुंबियांवर शोककळा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या शहरातील सातपुते कुटुंबियांचा मुलगा घसरून पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी आई-वडिलांनी धरणात उडी मारली. लाटेबरोबर बाहेर येऊन पिता बचावले. परंतु मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज सायंकाळी ही घटना घडली. रात्री दोघांचे मृतदेह धरणाच्या बाहेर काढण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, शहरातील बोरूडे मळा येथील रहिवासी असलेले सातपुते कुटुंब इतर शेजारील कुटूंबाबरोबर मुळा धरण पाहण्यासाठी आज गेले होते. धरणाला फेरफटका मारून गणेश सातपुते (43), पूजा गणेश सातपुते (37) व ओंकार गणेश सातपुते (13) हे तिघे जण पाण्याजवळ उभे होते. यावेळी मुलगा ओंकारचा खडकावरून पाय घसरल्याने तो धरणाच्या पाण्यात पडला. मुलगा पाण्यात पडल्याचे पाहताच वडील गणेश सातपुते यांनी मुलाला पाण्यातुन बाहेर काढण्यासाठी उडी टाकली. मात्र या बाप लेकाला पाण्यात पोहता येत नसल्याने दोघेही बुडून लागले. आपला नवरा व मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून क्षणाचा विलंब न करता पूजा सातपुते यांनी नव-याला हात देऊन बाहेर काढल्याने लाटेबरोबर बाहेर आल्याने त्यांचे प्राण बचावले. दरम्यान पुजा यांनी मुलगा यास वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोघे पाण्यात बुडाले.

पत्नी व मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून गणेश यांनी मोठ्याने आरडाओरड सुरू केली त्यानंतर इतर लोक मदतीसाठी धावले. परंतु दोघांनाही वाचविण्यात यश आले नाही.

You might also like