MLC Election : महाविकास आघाडी Vs भाजप पहिला सामना ! ‘या’ 5 जागांवर भिडणार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील 5 जागांसाठी येत्या 1 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं आज (सोमवार, दि – 2 नोव्हेंबर 2020) निवडणुकीची (MLC Election) घोषणा केली. राज्यात राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांवरून रस्सीखेच सुरू असतानाच आता ही निवडणूक देखील होताना दिसणार आहे.

नागपूर, पुणे आणि औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ आणि अमरावती व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होईल. कोरोना संसर्गामुळं (COVID-19 Pandemic) सुमारे 5 महिने ही निवडणूक लांबली. नागपूर, पुणे आणि औरंगाबादचे अनुक्रमे अनिल सोले, चंद्रकांत पाटील व सतीश चव्हण तर अमरावती व पुणे शिक्षक मतदारसंघातून श्रीकांत देशपांडे व दत्तात्रय सावंत यांनी प्रतिनिधीत्व केलं.

ऐन दिवाळीच्या उत्सवात (Diwali Festival) निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी नामांकनासाठी अखेरचा दिवस तर, 13 तारखेला छाननी होऊन 17 तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. 1 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तर 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात निनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल.

भाजपला मिळणार तगडं आव्हान
राज्यात कोरोना साथीचं संकट ओढवल्यानंतर सर्वच निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता कोरोनाची साथ काही प्रमाणात नियंत्रणात येत असतानाच राज्यातील ही पहिलीच निवडणूक असून या निमित्तानं महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध भाजप असा जंगी सामना रंगण्याची चिन्हं आहेत. पदवीधरच्या 3 पैकी 2 जागा भाजपकडे (BJP) आहेत. या जागा राखण्याचं मोठं आव्हान भाजपपुढं असणार आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष या 5 जागा एकत्रितपणे लढणार का ? एकत्रित लढणार असतील तर जागांचं वाटप कसं होईल ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

या 5 जागा झाल्या रिक्त
2 शिक्षक आणि 3 पदवीधर मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांचा कार्यकाळ 19 जुलै रोजी संपला होता. त्यानंतर कोरोना साथीमुळं या रिक्त जागांवरील निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. हे 5 मतदारसंघ व तेथील मावळते सदस्य पुढीलप्रमाणे –
1) औरंगाबाद विभाग पदवीधर – सतीश चव्हाण
2) पुणे विभाग पदवीधर – चंद्रकांत पाटील (महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वियजी)
3) नागपूर विभाग पदवीधर – अनिल सोले
4) अमरावती विभाग शिक्षक – श्रीकांत देशपांडे
5) पुणे विभाग शिक्षक – दत्तात्रय सावंत