CAA : भाजपशासित राज्यांमध्येच हिंसाचार, राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी सांगितलं

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशात हिंसक आंदोलने सुरू आहेत. दिल्लीतील जामिया आंदोलनातील विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीवरून गृहमंत्री अमित शहा यांना जनरल डायरची उपमा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. नागरिकत्व कायद्याविरोधात केवळ भाजपाशासित राज्यांमध्येच हिंसाचार होत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी पोलीस यंत्रणेच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

नवाब मलिक म्हणाले, देशभरात सीएए आणि एनआरसीविरोधात तीव्र आंदोलन होत आहे. भाजपशासित राज्य किंवा दिल्लीसारखे राज्य ज्या ठिकाणी गृहखाते भाजपकडे आहे, तिथे आंदोलन हिंसक होत आहे. ही परिस्थिती हाताळण्यास तेथील पोलीस असमर्थ ठरत आहेत.

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, दिल्लीत आंदोलन अत्यंत तीव्र झाले. उत्तर प्रदेशातील आंदोलनात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पण पोलिसांकडून ५ मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे. बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये धार्मिक अत्याचारांचा बळी ठरलेल्या बिगर मुस्लीम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद सीएएमध्ये आहे. हा कायदा मुस्लीमविरोधी असल्याचा आरोप होत आहे. बिहारमध्येही आगडोंब उसळला आहे. बिहारमध्ये आरजेडीने बंदची हाक दिली आहे. आरजेडी कार्यकर्ते हातात काठ्या घेऊन रस्त्यावर आले आहेत. अनेक रेल्वेही रोखल्या जात आहेत.

राज ठाकरेंची केंद्रावर टीका
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोदी सरकारला लक्ष्य केले आहेत. या विषयांना वेगवेगळे कंगोरे आहेत ते समजून घेतले पाहिजेत, असे म्हणत ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना उपरोधिक टोला लगावला आहे. मी अमित शहा यांचे अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी अशी खेळी खेळली आहे की, आर्थिक मंदीवरून सगळे लक्ष दुसरीकडे वळवले आहे, अस ठाकरे यांनी म्हटले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/