‘ते’ बारामतीला ‘झुकतं’ माप देवू शकतात तर मी का नाही, अशोक चव्हाणांची ‘होमपीच’वर तुफानी ‘बॅटिंग’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – आज भोकर येथील आपल्या होमपीचवर सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण बोलत होते. तेव्हा ते म्हटले की, बारामतीवाले बारामतीला झुकते माप देवू शकतात तर मी नांदेडसह मराठवाड्याला का देवू शकणार नाही. तसेच मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर निव्वळ २ बैठकांमध्येच ५० विविध विकासकामांना चालना देऊन आल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हा अनेकांनी भाकीत केले होते की हे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. त्यात प्रामुख्याने भाजपाच्या अनेक नेत्यांचा समावेश होता. तर त्याच मुद्द्याला धरून आता अशोक चव्हाण यांनी भाजपाला खोचक टोला लगावला आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार हे संविधानाच्या चौकटीनुसार चालणारे सरकार असून ते फक्त ५ नाही तर पुढील १५ वर्ष चालणार आहे.

अशोक चव्हाण भोकर येथील मोंढा मैदानात सत्कार समारंभात बोलत होते. भोकरवासियांनी अशोक चव्हाण यांचा सार्वजनिक बांधकाममंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याबद्दल नागरी सत्काराने त्यांना पुरस्कृत केले. तसेच त्यांच्यासमवेत माजी आमदार अमिता चव्हाण यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला.

यावेळी अशोक म्हणाले की, या अगोदरच्या भाजप सरकारने गेल्या ५ वर्षात मराठवाड्याच्या हिताच्या काहीच गोष्टी केल्या नसून मराठवाड्याच्या वाट्याला काहीच मिळू दिले नाही. तसेच त्यांनी मराठवाड्याचा आपण विकास करू असे सांगत ‘उपरवाला जब देता है, छप्पर फाड के देता है’ असे म्हणत नांदेड जिल्ह्याला आणि मराठवाड्याला सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह मराठवाड्याचा विकास करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/